प्रक्रिती और परमात्मा एकही चीज के दो छोर हैं. दोनों मे अंतर है भी तो दो छोरों जितना. यही अद्वैत है. -ओशो
TwitterLiked the quote? Tweet it!
see all quotes

काकस्पर्श


Note: To be able to read this Marathi text, please ensure you have set View->Character Encoding to Unicode (UTF-8) in your browser.

मौजे पालशेत, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी, येथे आमचे प्रशस्त दुमजली घर आहे. ते सुमारे तीनशे वर्षे जुने आहे. घरा मध्ये मोठ्या ओट्या, पडव्या, स्वयंपाकघर, माजघर व बाळंतिणीची खोली आहे. पडव्यांना लोखंडी गज आहेत. पुढे मागे मोठे अंगण आहे. घराशेजारी मोठे न्हाणीघर आहे. त्यात जुन्या पद्धतीच्या खूप मोठ्या, पाणी साठवायच्या, दगडी दोण्या आहेत. थोड्या वरच्या अंगाला मोठा गोठा आहे.

घराच्या मागच्या बाजूला मोठ्या व्यासाची खोल विहीर आहे. ही विहीर माझे पणजोबा यांनी १९२० साली खणून फरसबंदी चिऱ्यानी बांधून काढली आहे. त्यावर बैल-रहाट चालत असे. त्याकाळी त्यासाठी रु. १८,००० खर्च आला होता अशी नोंद आहे. विहिरीपासून दगडी पाटांमधून, म्हणजे चॅनेल (channel) मधून, दोण्यांपर्यंत व बागेमध्ये सर्वत्र पाणी फिरवले आहे. घराच्या चारही बाजूस मजग्या, म्हणजे टेरेस फील्ड्स (terrace fields), आहेत व त्यात चौंढे, म्हणजे भाग, पाडून बाग व शेते योजली आहेत.

या मजग्यांमध्ये नारळी व पोफळी (सुपारी) यांची लागवड केली आहे. आंबा, चिक्कू, फणस, केळी, जांभूळ, जांभ, पपनस, अननस, रामफळ, कोकम इत्यादी फळे लावली आहेत. बारा प्रकारच्या जास्वंदी, अनेक प्रकारचे गुलाब, जाई, जुई, रातराणी, अनंत, पारिजातक, सोनचाफा, तसेच पांढरा, तांबडा, हिरवा, व कवठी चाफा इत्यादी फुले लावली आहेत. काही भाग शेतीसाठी राखून ठेवला आहे. त्या चौंढ्यांमध्ये भात, कुळीथ, कडवे वाल, नाचणी अशी पिके घेतली जातात.

वाचायला हे जरी रम्य वाटत असले तरी कोकणात राहून सर्व व्यवस्थापन करण्यात अनेक अडचणी असतात. उत्तम मजुरी देण्याची तयारी असूनसुद्धा वेळेवर आवश्यक मनुष्यबळ मिळणे फार कठीण. आजकाल केबल टीव्ही प्रत्येक घरात असतो व पूजा, लग्न इत्यादी कार्यक्रम लाऊडस्पीकरवर (loudspeakers) होतात पण लोड शेडिंग (load shedding) सवयीचेच आहे व विद्युत, वैद्यकीय इत्यादी आत्यवश्यक सेवा मिळणे अवघड आहे. सर्व काही कमर्शियल झाल्याकारणाने घर सारवायला शेण सुद्धा विकत घयावे लागते. एकूणच कोकणात राहण्याचे आर्थिक गणित बिकट आहे. प्रत्येक कामाला अपार कष्ट पडतात, तेही स्वत:च करावे लागतात, आजकाल मनुश्यबळ मिळणे जवळजवळ अशक्य झाले आहे. कोकणात घर बांधून राहण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी याचा जरूर विचार करावा.

माझे वडील, निवृत्तीपश्चात आपले वाडवडिलांचे घर व बाग जतन करावी या प्रेमभावनेने आमच्या घरी रहायला व व्यवस्थापन पहायला लागले. एकदा आर्थिक झळ सोसायचे ठरवले व त्याकडे दुर्लक्ष करण्याइतकी अलिप्तता अंगी आली, की मग कोकणात राहण्याचा खरा आनंद घेता येतो. सर्व अडचणी सहन करून व गावातले शेजारी व मित्र परिवारासोबत परस्पर सहकार्याचे धोरण अवलंबून माझे वडील तेथील व्यवस्था बघतात.

कोकणातील प्रदूषण विरहित हवा, अंब्याच्या मोहोराचा सुवास, मुसळधार पावसात प्यायलेला वाफाळलेला चहा, आपल्या विहिरीचे मधुर पाणी, दारची फळे व धान्य, अवतीभवतीची हिरवाई, ऋतुनुसार फुललेली सुगंधित बाग, पक्षांची किलबिल, अथांग नितळ चांदणे, व शेणाने सारवलेल्या जमिनीवरची शांन्त झोप हे सुख आम्हाला कुलदैवताच्या कृपेमुळे व पूर्वजांच्या कष्टांमुळे लाभले आहे. माझे पणजोबा, बाबूजी, यांनी शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी वास्तूमध्ये व बागायतीमध्ये वाढ केली व सर्व प्रकारच्या फळाफुलांनी बागा सजवल्या. त्यानंतर माझ्या आजोबांनी निवृत्तीनंतर तेथे राहून पुन्हा बाग फुलवली. आता माझे वडील तेथील व्यवस्था पहात आहेत. आमचा हा सुखाचा ठेवा असाच राहो ही परमेश्वरचरणी प्रार्थना.

आमच्या घरात या आधी अतुल कुलकर्णी अभिनित 'चकवा', व मधुराणी गोखले-प्रभुलकर अभिनित 'सुंदर माझे घर' या मराठी चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेला महेश मांजरेकरांचा 'काकस्पर्श' याचेही चित्रीकरण तेथे झाले. मांजरेकरांनी, या पीरियड फिल्मकरताच आमचे घर निर्मित झाले असल्या इतके त्यांना ते आवडले, असा अभिप्राय दिला आहे. त्यांची टीम सुमरे महिनाभर आमच्या घरी होती. वेळ्णेश्वर, गुहागर, तळीं अशा जवळच्या गावात त्यांची राहण्याची व्यवस्था होती.

पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत काम चाले. लाईट च्या वायरी काढणे, काळाला साजेशी रंगसंगती करणे, थोडे आवश्यक लाकूडकाम करणे, कौले बसवणे, असे चित्रपटाला साजेसे बदल त्यांनी घरात करून घेतले. गावातील बऱ्याच कुटुंबांनी खूप हौसेने चित्रीकरणामध्ये भाग घेतला. छोटे रोल केले, तसेच, कोकणातील खास पदार्थ, वाहन व्यवस्था, वगैरे सेवा मांजरेकरांच्या युनिटला दिल्या. इतकेच काय, पण त्या काळाला शोभेल असे ताक घुसळण्याचे यन्त्र, पीठ दळण्याचे जाते, व जुने फर्निचर, आमच्या व जवळच्या गावांतून मिळाले.

या दरम्यानचे मांजरेकरांचे व सर्व कलाकारांचे अनुभव, चित्रपटाची प्रसिद्धी झाली तेव्हा झी टीव्ही व इतर वाहिन्यांवर प्रसिद्ध झालेच आहेत व म्हणून त्याबद्दल अधिक लिहीत नाही. महेश मांजरेकर व टीम ने आमच्या वास्तूतील उपलब्ध सर्व स्पौट्सचा (spots) चित्रीकरणासाठी उत्तम उपयोग करून घेतला आहे. १९३० सालामध्ये जसे घर होते तसेच अजून माझ्या वडिलांनी ठेवले आहे. त्यामुळे चित्रपट खूप नॅचरल (natural) व बिलीव्हेबल (believable) झाला आहे व प्रेक्षकांना अलगद १९३० सालात घेऊन जातो. एकूणच मांजरेकरांनी लोकेशनचे चीज केले आहे.

चित्रपटासाठी आमच्या घराची निवड केल्याबद्दल आम्ही कुटुंबीय श्री. महेश मांजरेकरांचे खूप आभारी आहोत. मराठी कला जगताला आपल्याकडून थोडा हातभार लागावा, व कलेची सेवा घडावी, या उदात्त हेतूने माझ्या वडिलांनी घर चित्रीकरणासाठी देऊ केले. आमच्या पूर्वजांनी बांधलेली इतकी सुंदर जुनी वास्तू, या व्यव्हारिक जगाचे व्याप झेलत, बंधने सोसत, त्यांतून खंबीरपणे झगडत, सरव्हायवर (survivor) म्हणून आजही उभी आहे. मांजरेकरांच्या या चित्रपटामुळे, या वास्तूस परीसस्पर्श होऊन, ती पुन्हा एकदा प्रकाशाने झळाळली आहे असे आम्हा कुटुंबियांना वाटते. हा योगायोग मराठी सिनेमा शतकात पदार्पण करत असताना जुळून यावा, याचे आम्हला अप्रूप आहे. शतकमहोत्सवी वर्षात मराठी सिनेमाला ही आमच्याकडून भेट आहे.

टीप: नेने कुल मंडळाच्या जून २०१२ पत्रकासाठी हा लेख देताना अत्यंत आनंद होत आहे. पत्रक प्रकशनानंतर आपण हा लेख www.atulnene.com या माझ्या ब्लौगवरही वाचू शकता.

Message in Public Interest
Laughing ...

About

Human. Professional. Technologist. Musician. Naturophile. Linguaphile. Traveller. Philosopher. Friend. Don't-Worry-Be-Happy-ist.